भाव-संवादमधील संवाद – मनाचा मनाशी
श्रीमती कांबळे यांचा भावसंवाद हा भक्तिगीतसंग्रह अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गीतांमधील अनुभूति जिवंत व सच्ची वाटते. मीरा, सखू, जना या संत कवयित्रींशी श्रीमती कांबळे यांचे कुठेतरी नाते आहे असे जाणवते. अलीकडील काळातील बहिणाबाई चौधरी यांच्याही पंक्तीत त्या सहज बसू शकतील.

मीरा, सखू, जना, बहिणाबाई यांच्याप्रमाणेच श्रीमती कांबळे यांचेही लौकिक शिक्षण फारसे झालेले नाही; त्यामुळेच त्यांच्या रचनेत वृत्तदोष किंवा अप्रयोजक शब्दयोजना यासारखे दोष काहीवेळा आढळतात. परंतु शबरीने अर्पण केलेली बोरे उष्टी आहेत याकडे लक्ष न देता, शबरीचा उत्कट भक्तिभाव तेवढा रामचंद्रांनी ग्रहण केला, तसेच रसिकही श्रीमती कांबळे यांच्या गीतातील आर्ततेने सहकंपित होऊन उठतील, असा विश्वास वाटतो.

विठ्ठलाशी त्या किती भूमिकांतून बोलतात, ते पाहण्यासारखं आहे. कधी त्या शिष्य होतात व विनासहमती गुरू मानतात; कधी त्याला धन्वंतरी मानून भवतापावर औषध मागतात; कधी वाळवंटात एकटा उभा असलेला विठ्ठल त्यांना जोगी वाटतो, तर कधी बुद्धिबळ खेळणारा खेळाडू वाटतो.
श्रीमती कांबळे यांच्याशी अशा तऱ्हेतऱ्हेने संवाद करणारा हा विठ्ठल तुमच्या आमच्याशीही संवाद करू शकेल. त्यासाठी त्यांच्या ह्या गीतांशी, त्यातील भावनांशी समरस मात्र व्हायला हवे.
- वसंत निनावे
२५.१०.८०
❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈❈ ❈ ❈ 🌸 ❈ ❈ ❈
भाव-संवादमधील दोन शब्द
सौ. कांबळे यांचा गीतकार म्हणून माझा परिचय फार पूर्वीपासून आहे. वेळोवेळी त्यांची गीते मी आपुलकीने वाचली आहेत. त्याचवेळी जाणवत होते की, हा प्रतिभेचा स्फुलिंग एक दिवस ज्योतीचे रूप धारण करणार! ते आज खरे ठरले.

सौ. कांबळे यांची गीते ही गीते नसून तो ‘अंतरीचा उद्गार’ आहे, हे ती गीते वाचल्याक्षणीच जाणवते. ह्या गीतातील भाव एवढा उत्कट आहे, इतका अस्वस्थ करून सोडणारा आहे, त्यात एवढी परकाया-प्रवेश-क्षमता आहे की, कोणाही संगीतकारास ती स्वरबद्ध करण्याची इच्छा होईल, गीतांतून सूर आपोआप त्याच्यापुढे हात जोडून उभे राहतील.
- भानुकान्त लुकतुके
९.११.८०